नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
आजचा संदेश श्री विजय कदम यांच्या कडून
आपल्या प्रतिक्रिया त्यांना कळवाव्या
ब्रम्हसूत्र विशद करताना महर्षी व्यास म्हणतात, !!ईक्षतेर्नाशब्दम!! व्यास म्हणतात, "ईक्षते" म्हणजे विचार करते, संकल्प करते. हे आपल्या आद्यावस्थेत असताना आपल्यातच रममाण झालेले असते. तिथे कोणताच विस्तार नसतो. ते एकच एकटे असते. कोणताच संकल्प तिथे स्फुरण पावलेला नसतो. म्हणजेच बाह्य दृष्टीला दिसणारा हा जगत- पसारा नसतो. याला व्यास "अशब्दम" असे म्हणतात. जेव्हा त्या ब्रम्हाच्या ठिकाणी पहिलं स्फुरण होतं, पहिला संकल्प होतो तो "ओंकार". आपल्याला भगवद्गीता जे "ओमित्येकाक्षरम" असं सांगते. ब्रम्हवाद्यांंचे कोणतेही कार्य "ओम" म्हणून होत असते. ते त्या ब्रम्हाचे आद्य स्फुरण होय. ही त्यात निर्माण झालेली पहिली क्रिया आहे. हा पहिला विकार आहे. हाच पहिला शब्द. भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, "प्रणव: सर्व वेदेषु शब्द: खे" . इथे पहिल्यांदा या ओंकारातून आकाश म्हणजेच पोकळी निर्माण झाली आणि या आकाशाचा गुण आहे "शब्द". व्यास जे म्हणतात "अशब्दम" , तेव्हा हे ओंकाराचं स्फुरण झालेलं नव्हतं. म्हणून हे जगतापासून "ब्रम्ह" असण्याचे कारण होत नाही. ब्रम्ह त्याच्याही आधी आहेच. ओंकार हा त्रिगुणात्मक आहे. म्हणून तो नियंत्रित आहे. तिन्ही गुणांच्या पलिकडे ब्रम्ह आहे. तरीपण जर ब्रम्ह गाठायचं असेल तर या ओमकारस्वरुपाला हाताशी धरावं लागतं. कारण ब्रम्ह निर्विकार, निर्गुण आहे. काही साध्य करायचं असेल तर ते मुळात आकारमय असायलां हवं. म्हणून ध्यानादि क्रिया करताना " ओम" हाच ध्यानी धरायला हवा. जरी आपण म्हटलं कि; संकल्प, विचार हा प्रकृतिच्या दृष्टीनुसार केला तर ते योग्य नाही, कारण तिथे "आत्म" हा शब्द आहे. व्यास म्हणतात, "गौणश्चेन्नात्मशब्दात" . ही प्रकृती या जगाचे कारण नाही. या जगाचे कारण हे ब्रम्हच आहे. प्रकृती या जगाचा सांभाळ करते. मुलत: हे जगत त्रिगुणात्मक आहे. या गुणांच्या अधीन राहून प्रकृती नावाची व्यवस्था आहे. हिलाच "मम माया दुरत्यया: " असे भगवद्गीतेत म्हटलं आहे. म्हणून प्रकृती ही ब्रम्हवाचक नाही. ती विकारमय आहे. ब्रम्ह विकारमय नाही. यासाठी पुढचं सूत्र सांगतात, "तन्निष्ठस्य मोक्षोपदेशात" या ब्रम्हाच्या ठिकाणी स्थित असणारी "मुक्ती" सांगितली आहे. मोक्ष तेव्हाच, जेव्हा ब्रम्हप्राप्ती होईल. प्रकृती मोक्षाचे कारण नसून ते बंधाचे कारण आहे. प्रकृती स्वत:चे काहीच निर्माण करीत नाही. ब्रम्हच आपल्या स्वत:ला त्रिगुणात्मक मायास्वरूपात प्रकट करतं. म्हणून मोक्ष प्राप्तीसाठी " नि: स्त्रैगुण्यो भवार्जुन" असं भगवंत म्हणतात. आत्मप्राप्ती म्हणजेच मोक्ष. म्हणून "आत्मा" हा शब्द जो काही योजिला आहे तो ब्रम्हवाचक आहे. आपण व्यवहारातसुद्धा स्वत: विषयी "आत्म" हा शब्दप्रयोग करतो. आपल्याहून भिन्न पदार्थासाठी, उदा. पुस्तक, झाड, घर इत्यादीसाठी "आत्म " हा शब्द योजित नाही. म्हणून दिसते ते ब्रम्ह नसून त्यात ब्रम्ह समाविष्ट आहे. ते जाणण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणाली, "मंथूनी नवनीता तैसे घे अनंता! वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु!!" !!हरीओम !!
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
वैद्य रुग्णाला औषध देतो. हे औषध देताना वैद्य आजाराचा विचार तर करतातच पण प्रामुख्याने रुग्णाच्या प्रकृतीचा विचार केला जातो. म्हणजे त्याला निषिद्ध असणाऱ्या गोष्टी कोणत्या, त्याचा स्वभाव कसा आहे, या साऱ्या गोष्टींचा विचार करून औषधाची योजना केली जाते. इथे वैद्याने रुग्णाला जाणणं, ओळखणं, गरजेचं असतं. आपल्याला जी आध्यात्मिक प्रगती साधायची आहे त्यासाठीचा मार्ग निवडताना अशाच पद्धतीने आपला स्वभाव, आपली देहबोली, आपले विचार, या गोष्टींच्या माध्यमातून स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. पण आपण स्वतःला ओळखण्यात कमी पडतो आणि मग चुकीचा मार्ग निवडला की अध्यात्मात प्रगती साधत नाही म्हणून कुरकुरत बसतो. यासोबत आणखी एक गोंधळाची गोष्ट अशी असते की आपण एकाच ठिकाणी कायम श्रद्धेने, निष्ठेने, रत राहत नाही. अडचणीच्या वेळेलाच आपल्याला भगवंत आठवतो. सुखात कधी आठवतो का हो? हाच बुद्धीतला चिखल आहे. परमेश्वर सर्वत्र आहे आणि सर्वप्रसंगी आहे यावर आधी श्रद्धा हवी. मग सुखातही तो आपल्या सोबत आहे आणि दुःखातही तो आपल्या सोबत आहे हे लक्षात येईल. मग आपोआपच सुखाने आनंदून जाताना आपले हात कृतज्ञतेने जोडले जातील आणि दुःखाच्या वेळी करुणा भाकतानाही तो आपल्या सोबत आहे या विश्वासाने झगडण्याची एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळून जाईल. पण त्यासाठी बुद्धीतला हा चिखल साफ करायला हवा.
असो. अधिकचा विचार रविवार १४ जानेवारीच्या जीवनगीतेत करूया.
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
आता जर आपण भावनाप्रधान असू तर शास्त्रात त्याकरता भक्तीमार्ग सांगितला आहे. भक्ती केली की भगवंत प्रसन्न होईल म्हणजे मग आपले प्रश्न आपोआप सुटू लागतील. जी विविध स्तोत्र आहेत त्या प्रत्येक स्तोत्राच्या अखेरीला फलश्रुती सांगितलेली असते. म्हणजे आपण पुन्हा इथं कितीतरी योजनं मागे जातो. कारण ही तर सकाम भक्ती झाली. फार तर रजोगुणी म्हणता येईल. पण मुळात हा भक्तीयोग नाही हे लक्षात घ्यायला हवं. आता ज्याला कोणतं तरी कर्म सतत करत राहायला आवडतं त्याच्यासाठी शास्त्रांत कर्म करायला सांगितलंय. पण विहित कर्म किंवा दैनंदिन कर्म म्हणजे पुन्हा कर्मयोग नव्हे हे लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी माझ्या जन्माचं नेमकं कारण काय असू शकेल? हे जाणून ईश्वरप्रिय ठरेल असं कर्म करत राहणं. ज्या कर्माने स्वतःला आणि इतरांनाही आनंद मिळेल असं कर्म करणं म्हणजे कर्मयोगाच्या दिशेने पाऊल टाकणं. आता जे बुद्धिप्रधान असतील त्यांच्यासाठी सांख्यमार्ग किंवा ज्ञानमार्ग आहे. अर्थात ज्ञान लालसा असणं, ज्ञान प्राप्तीसाठी धडपडणं म्हणजे पुन्हा सांख्ययोग साधला असं नाही. तर हे ज्ञान आपण कशासाठी मिळवतो, त्यामधून आपल्या एकूणच दैनंदिन व्यवहारात नेमका कोणता बदल होतो, यावर हा ज्ञानमार्ग ज्ञानयोगाकडे जाणार की नाही ते ठरतं. म्हणूनच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ आणि ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम आहेत. प्रत्येक मनुष्य प्राण्यासाठी हा अतिशय नियोजनबद्ध आखून दिलेला मार्ग आहे. आपण तो मार्ग कसा आणि किती अनुसरतो यावर आपली आध्यात्मिक उन्नती अवलंबून आहे.
असो. अधिकचा विचार उद्याच्या जीवनगीतेत करूया.
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
‘मला त्याने फसवलं.’ ‘त्याच्याकडून माझ्याबाबतीत असं काही घडेल असं मला वाटलंच नव्हतं.’ अशा प्रकारची वाक्य आपण अनेकदा उच्चारली असतील किंवा ऐकली असतील. मंडळी, दुसऱ्याने आपल्याला फसवलं या वाक्यात सगळ्यात प्रथम आपली हार आहे हे लक्षात घ्यायला हवं. आता राहता राहिला पुढचा मुद्दा. त्याने फसवण्यासाठी आपण त्याच्या एवढे जवळ गेलो आणि तरी देखील तो आपल्याला फसवू शकतो या गोष्टीचा आपल्याला अंदाजही येऊ नये याचा अर्थ मुळात आपण त्याला ओळखलंच नाही. ‘मी मला चांगला ओळखतो’ अनेकांना असं म्हणताना मी ऐकलंय. मंडळी, एक म्हण आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. मंडळी, समोरच्या गोष्टीतला बारकावा सुद्धा हेरण्याची क्षमता असलेले आपण, आपल्याकडच्या ढोबळ गोष्टीही समजू शकत नाही, पाहू शकत नाही. आणि आपण उगाचच वल्गना करतो कि मी मला चांगला ओळखतो. आपला स्वभाव समंजस असेल, मान्य. दुसऱ्याला मदत करण्याचा असेल, हेही एक वेळ मान्य. पण मग याचा अर्थ समोरच्याला फसवण्यासाठी आपण संधी दिली हे लक्षात घ्यायला हवं. तो फसवणारच आहे. तुम्ही अथवा तुमच्या जागी अन्य कुणी असेल तरीही. त्याचा प्रयत्न तोच राहील. पण आपण जर आपल्याला ओळखलं असेल तर अशी फसगत होणारच नाही. हे एवढं विस्ताराने सांगण्याचं कारण की आता जर आपण स्वतःला जाणत असाल तर आपण सर्वात प्रथम हे जाणून घ्या की आपण भावनिक आहोत की आपण कृतिशील आहोत की आपण बुद्धिप्रधान आहोत. यानुसार आपल्या साधनेच्या मार्गाची आपल्याला निवड करावी लागेल. कारण ही निवडच तुमच्या बुद्धीचा मांद्य किंवा बुद्धीतला चिखल दूर करायला मदत करील.
असो. याचा अधिक विस्ताराने विचार उद्याच्या जीवनगीतेत करूया.
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
मंडळी, बुद्धीतला हा चिखल दोन प्रकारचा असतो. एक निर्विचारी असल्यामुळे आणि दुसरा अतिविचारी असल्यामुळे. विचारी होणं गरजेचं आहे, हे आपण सारे जाणतोच. पण त्या विचारांची दिशा नक्की असायला हवी. अतिविचारही घातकच आहे. योग्य तेवढा आणि योग्य दिशेने केलेला विचार तुम्हाला आध्यात्मिक उन्नती साधून देतो हे नक्की! मग आता हा विचार कसा करायचा? तर त्यासाठी सर्वात आधी आपण स्वतःला जाणलं पाहिजे. आपण कोण आहोत म्हणजे नांव, गाव, पत्ता, नव्हे, तर आपली मानसिकता कशी आहे? आपला स्वभाव काय आहे? हे जाणणं, समजून घेणं, सर्वात महत्त्वाचं. थोडंसं विषयांतर होईल, पण या अनुषंगाने हे सांगणं गरजेचं आहे म्हणून आवर्जून नमूद करतो की आपण अनेक शास्त्र, ग्रंथ, पुराण, यांचं वाचन करतो, अभ्यास करतो, चिंतन करतो. त्यातल्या घटना प्रसंगांवरती आपण अहमहमिकेने बोलतो. त्यावरील चर्चेत आवर्जून सहभागी होतो. पण हे बाहेरचं जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे आपण, आधी स्वतःला जाणलंय का? स्वतःला पूर्णपणे ओळखलंय का? हे समजून घ्यायला हवं. खरंतर आपण जवळपास सर्वच, स्वतःला ओळखतच नाही असं म्हटलं तरी चालेल. आता अनेक जण या वाक्यावर नाराज होऊ शकतात. पण लक्षात घ्या. कोणी आपल्याला बोल लावला, दूषणं दिली, शिवी दिली किंवा ओरडलं तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. असं का होतं? त्या व्यक्तीने आपल्या बाबत व्यक्त केलेली ती प्रतिक्रिया ही कशाच्या अनुषंगाने आहे, त्यात आपलं भलंबुरं काय आहे, हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याने आपल्याला जे सांगितलं, ते, आपल्याला तो जेवढा ओळखतो त्या अनुषंगाने त्याने सांगितलंय. मग त्यापलीकडे आपण आपल्याला ओळखलंय का? (आता स्वतःला ओळखायचंय ते प्रामाणिकपणे. त्याच्यात अवास्तवता किंवा अवाजवीपणा असता कामा नये हे नक्कीच!) जर ते ओळखलं असेल तर त्याच्या सांगण्याचा आपल्याला राग येता कामा नये. आपल्याला त्याची कीव वाटली पाहिजे की त्याने आपल्याला अजून पूर्ण ओळखलं नाही. पण आपण आपल्या ‘स्व’ बाबत सुद्धा विश्वासार्ह नसतो. आपल्याला स्वतःबद्दलच विश्वास नसतो. इथं आत्मविश्वास वेगळा आणि मी कोण आहे हे जाणून त्या विश्वासाने कृती करणं हा भाग वेगळा. आता हे स्वतःला कसं जाणायचं कसं समजून घ्यायचं हेही आधी जाणून घेऊया आज इथेच थांबूया.
अधिकचा विचार उद्याच्या जीवनगीतेत करूया.
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च।।२.५२।।
जेव्हा तुझी बुद्धी, भ्रमाच्या (कलील) दलदलीतून मुक्त होईल, तेव्हा तुला त्या सर्व गोष्टींपासून अलिप्तता प्राप्त होईल, ज्या ऐकण्यासारख्या आहेत किंवा ऐकल्याही आहेत. हा तर झाला या श्लोकाचा सरधोपट अर्थ. पण आता इथे ज्या भ्रमाच्या दलदलीचा उल्लेख केलेला आहे ते स्थान कुठलं? तर बुद्धी. हा महाचिखल बुद्धीमध्ये होतो. का? मंडळी, आपण नेहमी म्हणतो 'माझी द्विधा अवस्था झाली आहे.' थेट नेमका विचार न होणं म्हणजे आपण त्या भोवऱ्यासारखं एकाच जागी फिरत राहाणं. प्रगती साधायची असेल तर पुढे जाणं गरजेचं आहे. ते चलन उर्ध्वगामी किंवा एका नेमक्या दिशेने व्हायला हवं. एकाच बिंदू भोवती फिरत राहिलो तर त्याने प्रगती साधणार नाही. गतीचा आनंद मिळेल. मग गतीला प्रगतीकडे न्यायचं असेल तर बुद्धीचं मांद्य, बुद्धीतला हा चिखल निपटून काढायला हवा. तो कसा होतो? कधी याने सांगितलेलं हे बरोबर वाटतं, तर कधी त्याने सांगितलेलंही बरोबर वाटतं. कारण मुळात आपण त्या मूळ मुद्द्यावर विचारच करत नाही. अशा एखाद्या विषयावर, मुद्द्यावर, विचार करणं, म्हणजेच बुद्धीला कार्यप्रवण करणं. आपण नेहमी सगळ्यात पहिला बुद्धीचा आळस जपतो. पाठोपाठ शरीराचा. कारण शरीराला कितीही आळस असला तरी देहाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, देहधर्मासाठी, तो आळस झटकावाच लागतो. पण बुद्धीच्या बाबतीत तसं होत नाही. तिथे संपूर्ण आळस करूनही चालतं. मग माणूस सोपा पर्याय नेहमी आधी निवडतो. त्यामुळे बुद्धीतली साफसफाई तर दूरच त्यातला चिखल वाढवण्याचं काम आपण अधिकाधिक करत असतो. बघा, विचार करा. आपल्यालाही ही गोष्ट पटेल. मग आता त्यासाठी काय करायचं? तेही जाणून घ्यायला हवं. पण...
असो. अधिकचा विचार उद्याच्या जीवनगीतेत करूया.
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
आजचा संदेश श्री विजय कदम यांच्या कडून
आपल्या प्रतिक्रिया त्यांना कळवाव्या
ज्ञानोबा माऊली म्हणतात, "जीविचिया जीवा प्रेम भावाचिया भावा! तुजवाचूनी केशवा आनु नावडे!!" विठ्ठलाच्या ठिकाणी अपार प्रेम ज्ञानेश्वर माऊलींना होते आणि विठ्ठलालाही ज्ञानेश्वर माऊलींप्रती अपार प्रेम होते. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तेव्हा विठ्ठल ढसाढसा रडला होता. अशासाठी कि, त्याच्यावर अखंड प्रेम करणारा भक्त आता समाधिस्थ होणार होता. अश्रू दुःखाचे तर असतात तसे ते आनंदाचेही असतात आणि पश्चात्तापचेदेखील असतात. पण प्रेम भावनेने डोळ्यात आलेले अश्रू जीवभावाची ताटातूट होणार म्हणून असतात. खरंं प्रेम जिथे आहे तिथे विरह अजिबात सहन होत नाही. त्यातून विरह झालाच तर, ते दोघे दोन ध्रुवांवर का असेनात, एका ठिकाणी वेदना झाली तर दुसऱ्या ठिकाणी त्याचा पडसाद उमटतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विठ्ठला, तू माझ्या जीवाचा जीव आहेस, माझ्या प्रेमभावाचा भाव आहेस, म्हणून तुझ्याविना दुसरे कोणी आवडत नाही. मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि रावण यांच्यातील युद्ध समयीची एक कथा ऐकिवात आहे. राम- रावणांचे घनघोर युद्ध सुरू झाले. रामराय रावणाला रोज पराभूत करून पाठवीत असत आणि पूर्ण तयारीनिशी उद्या युद्धाला ये असं सांगत. असे काही दिवस गेले. सुग्रीवादि लोकांच्या मनात असा प्रश्न उभा राहीला कि, रामराय रावणाच्या हृदयावर बाण मारून त्याचा वध का करीत नाहीत? शेवटी हा प्रश्न हनुमंताकडे गेला. हनुमंताने विचार करुन सांगितले कि, आता रावणाच्या हृदयात सीतामाई आहे. आणि सीतामाई हे रामरायांचे प्रिय विश्व आहे. रावणाच्या हृदयातून सीतामाई बाजूला झाली कि प्रभू बाण मारतीलच. पण जोवर सीतामाई तिथे आहेत तोवर ते बाण मारणार नाहीत. कारण आता तिथे बाण मारल्यास तेथील सीतामाई नावाचे विश्व नष्ट होईल. मग हे युद्ध केल्याचा उपयोग होणार नाही. हा प्रेमभाव आहे. अतीव प्रेमाचा भाव आहे. प्रेम हा भीतीचा विषय नसून तो भक्तीचा विषय आहे. संतमहंतांचे प्रेम प्राप्त झाल्यास भीतीचे कारणच उरत नाही. भक्त आणि भगवंत यांच्या प्रेमात ते दोघे वेगवेगळे नसून एकच आहेत. भगवद्गीतेत भगवंत अर्जुनास म्हणतात, अर्जुना! तू आणि मी वेगळे नाही आहोत. तू तोच मी आणि मी तोच तू. त्यामुळे हे धर्मयुद्ध तू केलेस काय किंवा मी केले काय? मिळून एकच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "इये हृदयीचे तिये हृदयी घातले! हृदया हदयी एक झाले! द्वैत न मोडीता अर्जुना केले! आपणा ऐसे!!" खरंच ज्याच्यावर एखाद्याचे प्रेम असते तो कदापि कोणत्या गोष्टीचा लोभ धरीत नाही. अपेक्षा नावाची गोष्ट तिथे नसतेच मुळी. आणि असे प्रेम फक्त संत-सत्पुरुषच करू जाणतात. म्हणून संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ, आणि प्रेमच असल्यामुळे तळमळ, दुःख लेश असे नाहीच. !!हरीओम!!
9623845061
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: ।
जन्मबंधविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम्।।२.५१।।
अशाच आणखी एक आजींची ही कथा. त्यांचं वय ८८ वर्ष. तरीही स्वतःच्या पायावर ठामपणे उभ्या. हातात क्रेप कागदापासून सुंदर फुलं बनवण्याची अप्रतिम कला. आणि ती इतरांना शिकवण्याची फार मोठी हौस. त्या आजींशी माझी भेट झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून बालपण व्यतीत झालं. त्यानंतर एका अपघातामुळे चेहरा विद्रूप झाला. कुरूप असल्यामुळे शिक्षण घेता आलं नाही. परंतु नंतर कालौघात चेहरा बऱ्यापैकी ठीकठाकही झाला. लग्न झालं. पण नवऱ्याने टाकलं. पुन्हा घरी. मग खूप वर्षांनी पुन्हा लग्नाचा योग आला. आता कुठे सुखाचे दिवस येऊ लागले असं वाटत असतानाच दहा-बारा वर्षात पुन्हा त्या पतीला स्वर्गवास झाला. मग मात्र त्या बाईंनी स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. अचानक आपल्या हातात एक अप्रतिम कला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आता त्या कलेला त्यांनी अधिक विकसित करायचं ठरवलं. त्यांचं स्वावलंबी जगणं आता सुरू झालं. दरम्यान त्यांना दोन कन्याही झाल्या होत्या. ही कला आजींकडून शिकणाऱ्या अनेक विद्यार्थीनी त्यांच्यावर आईसमान प्रेम करतात. त्या दोन कन्या देखील त्यांची व्यवस्थित काळजी घेतात. पूर्वायुष्यात प्रतिकूल परिस्थिती आणि वर्तमानात सुख समाधानाचे दिवस अनुभवणाऱ्या आजी गीतेचं तत्वज्ञान खरंतर कोळून प्याल्यात. पण तरी देखील अधून मधून विविध घटनांनी मन खंतावतं असं त्या म्हणाल्या. मी म्हटलं, “काय झालं?” त्या म्हणाल्या, “अहो माझे जावई आज साठीचे आहेत. डायबिटीसमुळे पायाला झालं गँगरीन. म्हणून शेवटी पाय कापावा लागला. आता ते माझ्याच घरात राहतात. त्यांच्या वेदना, माझ्या मुलीचे होणारे हाल, मला पाहवत नाहीत. परमेश्वर हे सारं दुःख मला का पाहायला लावतो? त्यापेक्षा मला घेऊन का जात नाही?” अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्या, देव आणि विज्ञान यात विज्ञानाची कास धरणाऱ्या, पण कोणती तरी एक शक्ती या ब्रम्हांडात आहे आणि ती या सर्व जगताचं चलन वलन करते ही धारणा असणाऱ्या आजी. आज खंतावल्यात. माझ्यावर प्रचंड अन्याय होतोय असं त्यांना वाटतंय. हे बुद्धीला आलेलं मांद्य आहे. म्हणजेच बुद्धीवर आवरण चढलंय. खरंतर हे दूर करणं गरजेचं आहे. स्वतःच्या हातून घडणाऱ्या कर्मातून त्यांना आणि इतरांना मिळणारा आनंद, पण आज त्याचा सोहळा होत नाही. कारण त्या पुन्हा आपली मुलगी, जावई, त्यांचं दुःख, यात गुंतू लागल्यायत. खरंतर वयाच्या या टप्प्यावर त्यांनी या सर्वातून अलूप, वेगळं व्हायला पाहिजे. पण मंडळी, हेच जमत नाही. अशा परिस्थितीतून मार्ग दाखवण्यासाठी भगवंत जन्मबंधविनर्मुक्ता: असं सांगतायत. म्हणजे काय? तर यशाची धुंदी नाही, अपयशाची खंत नाही. दिलास पुन्हा जन्म आनंद आहे. नाही दिलास तर मोक्ष तुझ्याच पायाशी. अशी मनोधारणा असायला हवी. ती नाही. म्हणजे अजूनही मी म्हणजे देह हा भाव आहे. याहीपलीकडे जात मी जे काही कर्म करते आहे त्याचा कर्तृत्वभाव सुद्धा त्यांना आहे. स्वतःला सावरण्याचा हाच तो महत्त्वपूर्ण क्षण. ज्याचा कर्तृत्वभाव गळून जातो, ज्याची देहासक्ती संपते, तो खऱ्या अर्थानं मनीषिण: असा होतो. म्हणजे मनन, चिंतन यात रत होतो. अशा परिस्थितीत केलेलं कर्म तुम्हाला पदं गच्छंति म्हणजेच भगवंताच्या पावलाजवळ अर्थात परमपदाला घेऊन जातं हा विश्वास भगवंत या श्लोकामध्ये देत आहेत.
असो. अधिकचा विचार रविवार ७ जानेवारीच्या जीवनगीतेत करूया.
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: ।
जन्मबंधविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम्।।२.५१।।
समबुद्धीने युक्त असे ज्ञानी लोक हे, कर्मजं, म्हणजे कर्मापासून निर्माण होणाऱ्या फळाचा त्याग करून, जन्म बंधनातून मुक्त होऊन कर्म करतात, ते परमपद प्राप्त करून घेतात. मंडळी, भगवंत या सांख्ययोग अध्यायामध्ये अतिशय सौम्य गतीने पण एका ठराविक दिशेने आपल्याला घेऊन जाताहेत. आपल्या लक्षातही येणार नाही इतकी या विचारातली प्रगती सौम्य आहे. म्हणजे बघा, आता या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत? कर्म करायला तर सांगितलं. कर्मातल्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही हेही सांगितलं. त्याचबरोबर बुद्धीयुक्त कर्म करायला सांगितलं. त्यातही ती समत्व बुद्धी असावी हेही नमूद केलं. आता या श्लोकात भगवंत आणखी एक पाऊल पुढे टाकताहेत. ते कोणतं? तर जन्मरूप बंधनातून मुक्त होऊन जर समत्व बुद्धीने कर्म केलं तर ते कर्म करणारा परमपदाला प्राप्त होतो असं सांगताहेत. म्हणजे भगवंताला प्रिय होतो. तो भगवंत स्वरूपात मिसळून जातो असा विश्वास या श्लोकांमधून भगवंत व्यक्त करताहेत. इथे कृतकृत्यतेची जाणीव आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना, प्रसंगातून जात असताना, ज्या ज्या वेळी ही कृतकृत्य भावना आपल्या मनाला स्पर्शून गेली, त्या त्या क्षणी आपल्याला झालेला आनंद, हा शब्दातीत होता हे आपल्या लक्षात येईल. माझ्या ओळखीच्या एक ऐंशी वर्ष पार केलेल्या आजी होत्या. कुणा तरुणाच्या निधनाची वार्ता कळली कि त्या आजी तेव्हा नेहमी म्हणायच्या की, 'देव सुद्धा असं का करतो माहित नाही. आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना उचलायचं सोडून या तरुणांना का बरं नेतो?' तेव्हा मी बऱ्यापैकी लहान होतो. मला आश्चर्य वाटायचं की 'मला मरण दे, मला तुझ्याकडे घेऊन जा' असं कसं काय कोण म्हणू शकतं? पण त्या आजी म्हणायच्या. आज वाचन, अनुभव, निरीक्षण, श्रवण आणि चिंतन यामधून वयाच्या या टप्प्यावर आल्यावर मला त्या आजींच्या भावना समजतात. जेव्हा जगणं हा उपचार उरतो तेव्हा जगण्यातला आनंद संपलेला असतो. वेध मृत्यूनंतरचे असतात. पण सामान्यपणे आपल्याला त्याची जाणीव होत नाही कारण आपण अजूनही देहातच रमलेले असतो. जेव्हा कुणाच्या निधनाची वार्ता कळते तेव्हा मात्र त्या कृतकृत्यतेच्या भावनेशी आपण तद्रूप होतो. म्हणून त्या आजींच्या मुखातून तसे शब्द बाहेर पडत असतील. अन्यथा इतर वेळी चांगलंचुंगलं करून खाणं, इतरांना खिलवणं आणि सर्वांशी हसतमुखाने, आनंदी राहणं आणि स्वावलंबी जीवन जगणं असं करणाऱ्या आजी असं कसं बरं म्हणू शकतात, हा प्रश्न माझ्या मनात येणारच! सांगायचं तात्पर्य असं की देहातून बाहेर पडणं, देहाची आसक्ती सोडणं हे सर्वात पहिलं काम आहे. जे भगवंतांनी या दुसऱ्या अध्यायाच्या अगदी सुरुवातीला सांगितलंय आणि तिथून हा प्रवास सुरू झालाय जो आज कर्म तर करावंच लागेल पण ते करताना फळाची अपेक्षा न ठेवता आणि समत्व बुद्धीने करायचं हेही भगवंत आवर्जून सांगत आहेत. इथे नवा विचार जो भगवंतांनी दिला आहे तो जन्मरूप बंधनातून मुक्त होऊन कर्म करावं असा दिलाय. आता जन्मरूप बंधनातून मुक्त होणं म्हणजे काय? तर या देहासक्तीला पूर्णविराम देणं. जगणं कशाचं आहे? देहाचं आहे. हेच आपण जाणतो. हेच आपल्या मनात ठाम आहे. म्हणून त्या देहाचं साधन करून भगवत्प्राप्ती हे संतांनी आपल्याला शिकवलं. ते आपण विसरतो म्हणून जन्मरूप बंधनातून आपण मुक्त होत नाही.
असो. अधिकचा विचार उद्याच्या जीवनगीतेत करूया.
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
तस्मात योगाय युज्यस्व असं भगवंत म्हणतात म्हणजे तू समत्व योगाचा आश्रय घे असं सांगतायत. याचा अर्थ असं कर्म आपण करावं कि त्या कर्माने आपल्याला आनंद मिळेल आणि त्याचवेळी इतरांचेही अधिकार अबाधित राहतील. ते कर्म भगवद्प्रिय असेल. संपूर्ण समाजव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी प्रत्येकजण जे विहित कार्य करतो आहे, भले त्या कामाचं त्याला महिनाअखेरीला मानधन मिळत असलं तरीदेखील ते काम जर त्याने प्रामाणिकपणे केलं तर त्यामधून त्याला काम करून मानधन घेतल्याचं समाधान लाभेल आणि इतरांनाही त्यामधून योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. जसं पोलीसांचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आहे. पण आपल्या कामात जर पोलीस हलगर्जी करत असतील तर त्याने नागरिकांचं जगणं सुखमय होण्याऐवजी त्यांना त्रासच होईल. एखाद्या सरकारी कार्यालयात गेल्यानंतर तिथं काम करणारे कर्मचारी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील, तुमच्या कामात तुम्हाला मदत करतील, तर त्याने नागरिकांचं काम सुलभ होईलंच पण त्या कर्मचाऱ्यांनाही नंतर अधिकचं काम करावें लागणार नाही. कामाचा निपटारा झटपट होईल. दैनंदिन जीवनातली ही काही वानगीदाखल उदाहरण होती. पण जेव्हा कर्तव्यकर्म म्हणून आपण एखादं काम करतो तेव्हा मी कर्ता आहे हा कर्तृत्वभाव सोडून जर ते भगवंताने सोपवलेलं काम आहे म्हणून केलं, तर मग पाप-पुण्य, यशापयश, हे सारं भगवंताचं राहील. म्हणजे कर्म प्रामाणिकपणे करायचं. कर्तृत्वभाव स्वतःकडे न घेता करायचं. आणि भगवंताचं आहे असं समजून करायचं. मग त्यात सत्कृत्य-दुष्कृत्य हा भेद उरणार नाही. इथेच कर्मयोग साधेल. आता अशापद्धतीने कर्म करताना त्यातल्या कुशलतेला भगवंत दाद देत आहेत. ते कर्म योगयुक्त तेव्हा होईल जेव्हा ते कौशल्याने केलं गेलं असेल. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की कौशल्याने केलेलं कोणतंही काम हे कर्मयोग होईलंच असं म्हणता येणार नाही. कारण चोर सुद्धा चौर्यकर्म कौशल्यानेच करतो. केवळ कौशल्य हाच गुण अधोरेखित करायचा झाला तर चोर सुद्धा कर्मयोगीच ठरेल. पण चोरी हे योग्य कर्म नक्कीच नाही, कारण ते मुळात भगवंताचं काम नाही. कोणतंही कर्म हे योग्य आणि धर्मसंमत असलं पाहिजे. आता इथे धर्म या शब्दाची वेगळी व्याख्या करण्याची गरज नाही. कारण त्या कर्मामागचा प्रामाणिकपणा, त्यातली नीतिमत्ता आणि आपल्या जगण्याची आदर्श जीवनपद्धती या अनुषंगाने या धर्मसंमत शब्दाकडे पाहिलं की आपल्याला कोणतं कर्म हे कौशल्याने करायचं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता उरणार नाही. एकदा कर्ता मी नाही तर भगवंत आहे हे मानलं की मग अर्थातच त्या कर्माचें फळ मला मिळावं ही अपेक्षा देखील राहणार नाही.
असो. अधिकचा विचार उद्याच्या जीवनगीतेत करूया.
नमस्कार.
गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्।।२.५०।।
समत्वयोग आचरणात आणणं हेच कर्मातलं कौशल्य आहे असं भगवंत विश्वासपूर्वक इथे सांगताहेत. पण त्यासाठी समत्वबुद्धी अंगीकारणं गरजेचं आहे. ती अंगिकारल्याने काय होतं? तर सुकृत आणि दुष्कृत म्हणजे पुण्य आणि पाप या दोघांचाही त्याग होतो. या दोन्ही मधून तो मुक्त होतो. मग तो समत्वयोगाचा आश्रय घेतो. तस्मात योगाय युज्यस्व आणि साधकाकडून जेव्हा समत्वबुद्धी आचरणात आणणं सुरू होतं तेच कर्मयोगाचं कौशल्य आहे. यासाठी एक अगदी साधं उदाहरण देतो. समजा, आपलं वाहन आहे. दोन चाकी किंवा चार चाकी आहे. ते खूप मळलंय. साफ करायचंय. तर सामान्यपणे काय करतो आपण? साबण आणि पाण्याने ते वाहन आपण धुतो. आता गंमत अशी आहे कि ज्याला या कामातलं कौशल्य अवगत नाही, जाण नाही, त्याला जर हे काम सांगितलं तर अशी व्यक्ती थेट त्या वाहनावर पाणी मारील. पण मंडळी जो हे काम करण्यात कुशल असतो तो आधी काय करतो? एक कोरडा कपडा घेतो. त्या कपड्याने ती अख्खी गाडी झटकतो. त्याने काय होतं? त्याने वर बसलेली कोरडी धूळ उडून जाते आणि अर्धी गाडी चकाचक झालेली आपल्या लक्षात येतं. आता जो कचरा, घाण त्या गाडीला चिकटली आहे ती काढण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर होतो. पण आधीच जर साबण आणि पाणी मारलं तर सुखी धूळ सुद्धा ओली होऊन चिकटते आणि मग ते वाहन साफ करण्यासाठी अधिकचा साबण आणि पाणी वापरावं लागतं. आता यातलं कौशल्य काय? पाण्याचा कमीत कमी वापर करून कमीत कमी वेळेत गाडी अतिशय सुंदर अशी चकाचक बनली. हे कौशल्य. आता हे व्यावहारिक कर्मातलं कौशल्य झालं. इथे आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना अध्यात्मिक उन्नतीसाठी जे कर्म करतो आहे त्यातलं कौशल्य बुद्धीच्या योगाने आत्मसात करणं आणि तसं कर्म करणं भगवंतांना अपेक्षित आहे.
असो. अधिकचा विचार उद्याच्या जीवनगीतेत करूया.